
रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे दादरवरून सुरू करा, पावसाळी अधिवेशनात आ. भास्करराव जाधव यांची मागणी.
आमदार भास्करराव जाधव यांनी कोकणातील लाखो प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी दादर रेल्वे स्थानकाऐवजी दिवा स्थानकावरून सुटत असल्याने कोकणात येणार्या व जाणार्या चाकरमान्यांचे हाल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही रेल्वे पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सुरू करावी, अशी जोरदार मागणी केली.
पावसाळी अधिवेशनात गुरूवारी आ. भास्करराव जाधव यांनी रत्नागिरी-दादर पॅसेंजरबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः २०२१ पासून, रत्नागिरी-दादर पॅसेंजर (५०१०३/५०१०४) ही गाडी दादर रेल्वे स्थानकाऐवजी दिवा स्थानकावरून रत्नागिरीसाठी सोडली जात आहे. यामुळे प्रवाशांना, विशेषतः मुंबईत कामासाठी ये-जा करणार्या चाकरमान्यांना आणि अन्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो, तसेच प्रवासाचा त्रासही वाढतो. ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर येथून रत्नागिरीसाठी सोडावी आणि सामान्य कोकणी प्रवाशांचा त्रास वाचवावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.www.konkantoday.com