
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली, कैद्यांना अन्य ठिकाणी हलविणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे.सिमेंटच्या बांधकामामुळे दगडी भिंती कमकुवत झाल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ही भिंत कोसळल्याने कारागृहाच्या चारही बाजूंच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून, येथील कैद्यांना आता ओरोस येथील कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोसळलेली भिंत ही संस्थानकालीन होती आणि ती पूर्णपणे दगडी बांधकामाची होती. मात्र, अलिकडच्या काळात या भिंतीवर सिमेंटचे बांधकाम करण्यात आले होते. या सिमेंटच्या कामामुळेच मूळ दगडी भिंती कमकुवत झाल्या आणि आज अखेर ती कोसळली, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे कारागृहाच्या इतर भिंतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कैद्यांना ओरोस येथील सुरक्षित कारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जमीनदोस्त झाल्याने स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.