
डाबर’विरुद्ध अपमानास्पद जाहिरातींना मनाई, दिल्ली उच्च न्यायालयाच्या ‘पतंजली’ला सूचना!
नवी दिल्ली :* ‘डाबर च्यवनप्राश’विरुद्ध अपमानास्पद जाहिराती चालवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘पतंजली’ला मनाई केली आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी ‘डाबर’च्या याचिकेवर अंतरिम मनाई आदेश मंजूर केला. ‘पतंजली स्पेशल च्यवनप्राश’ हे ‘डाबर च्यवनप्राश’ आणि सर्वसाधारण च्यवनप्राशचा अपमान करत आहे, असा दावा करण्यात आला होता. इतर कोणत्याही उत्पादकांना च्यवनप्राश तयार करण्याचे ज्ञान नाही’, असाही दावा पतंजलीने केला होता.’डाबर’च्या वतीने वकील जवाहर लाला आणि मेघना कुमार न्यायालयात हजर होते. ‘पतंजली’च्या जाहिरातींमध्ये (आयुर्वेदिक औषध/औषधांच्या संदर्भात) खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली गेली आहेत, जी ‘डाबर च्यवनप्राश’शी तुलना करण्याऐवजी अपमानजनक आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेत पुढे असा दावा करण्यात आला आहे की जाहिरातीत इतर सर्व च्यवनप्राशच्या संदर्भात ‘सामान्य’ हा उपसर्ग वापरण्यात आला आहे, ज्यामुळे ते कनिष्ठ असल्याचे दिसून येते.जाहिरातीत असेही खोटे दावे केले आहेत की ज्यामध्ये इतर सर्व उत्पादकांना आयुर्वेदिक ग्रंथांचे आणि च्यवनप्राश तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूत्रांचे ज्ञान नव्हते, असेही त्यात म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी १४ जुलै रोजी ठेवली आहे.