
जयगड येथे हॉटेल व्यवहारात नऊ लाखांच्या फसवणूक प्रकरणी बाप- लेकाविरुद्ध गुन्हा.
रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे येथील “ओशन बीच” (नवीन नावः सीडेक सँडी रिट्रीट रिसॉर्ट) चालवण्यासाठी दिलेल्या वृद्ध महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रिसॉर्ट मालकांनी करार संपण्यापूर्वीच रिसॉर्टचा ताबा घेतला आणि महिलेची अनामत रक्कम व इतर साहित्य परत न देता हडप केले, तसेच विनयभंगही केल्याचा आरोप आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पुणे येथील ६५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. डॉ. योगेश मनमोहन जोग आणि मनमोहन जोग (दोघे रा. नांदिवडे, ता. जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना ६ जानेवारी २०२५ ते २० मे २०२५ या कालावधीत घडली असून, २ जुलै२०२५ रोजी दुपारी १.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८(४), ७५, ७९, ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोपींच्या मालकीचे “ओशन बीच” रिसॉर्ट तोंडी करारावर ६ जानेवारी २०२५ पासून चालवण्यास घेतले होते. रिसॉर्ट सोडण्यापूर्वी एक महिना आधी कळवणे आवश्यक असताना, फिर्यादींचे पती अचानक आजारी पडल्याने त्यांना उपचारांसाठी मुदतीपूर्वी दोन महिने आधी रिसॉर्ट सोडायचे असल्याचे त्यांनी आरोपी क्रमांक १, डॉ. योगेश जोग यांना कळवले होतेतरीही, आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी संगनमत करून, फिर्यादींच्या अनुपस्थितीत कामगारांकडून रिसॉर्टचा ताबा घेतला. त्यांनी फिर्यादीची अनामत म्हणून दिलेली ५ लाख रुपये रक्कम आणि रिसॉर्टमध्ये असलेले ४ लाख रुपये किमतीचे जुने वापरते साहित्य परत न देता अप्रामाणिकपणे स्वतःसाठी ठेवून घेतले. अशा प्रकारे दोघा आरोपींनी फिर्यादीची ९ लाख रुपयांची फसवणूक केली.याशिवाय, फिर्यादी रिसॉर्ट चालवत असताना, आरोपी क्रमांक २, मनमोहन जोग याने “डार्लिंग” असे शब्द वापरून अश्लील विनोद केले. ज्यामुळे फिर्यादींच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास जयगड पोलिस करत आहेत.