
आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद शनिवारी कार्यशाळा.
रत्नागिरी, दि. ३ :- फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनाइजेशन, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर्स बायर सेलर कार्यक्रमासाठी “आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद” या विषयावर शनिवार, ५ जुलै रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत हॉटेल सावंत पॅलेस येथे उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अ. अ. आजगेकर यांनी कळविले आहे.
ही कार्यशाळा मुंबईत होणाऱ्या आगामी रिव्हर्स बायर सेलर मीट, त्याची रचना आणि सहभागाच्या संधीबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची ओळख, बाजार संशोधन आणि लक्ष्यीकरणासाठी धोरणे, व्यापार व्यासपीठ, दुतावास आणि प्रदर्शनांचा फायदा घेणे, खरेदीदार प्रोफाइल आणि मागणी नमूने समजून घेणे, आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद साधणे, संवाद आणि संबंध निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, वाटाघाटी तंत्र आणि सांस्कृतिक संवेदनशीलता, तुमची उत्पादने प्रभावीपणे सादर करणे आणि अपेक्षांचे व्यवस्थापन करणे, यासोबतच, आगामी रिव्हर्स बायर सेलर मीट, त्याची रचना आणि सहभागाच्या संधीबद्दल माहिती कार्यक्रमाद्वारे सादर केली जाईल. त्यामुळे हे सत्र जागतिक स्तरावर व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट असलेल्या एमएसएमई निर्यातदार, उद्योजक आणि भाग धारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.