
शासनाच्या निर्णयानुसार आधार जोडणी न झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाखापेक्षा जास्त शिधापत्रिका होणार बंद.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार आधार जोडणी न झालेल्या शिधापत्रिका आता रद्द करण्यात येणार आहेत. गेली काही वर्ष राज्य शासनाच्या अन्न आणि पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांची आधार जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आता ११ जुलैपर्यंत आधार जोडणी करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत आधार जोडणी न केलेली रेशनकार्ड आता रद्द करण्यात येणार आहेत. सध्या आधार जोडणी न झालेली ३ लाख ३ हजार ४५४ रेशनकार्ड आता बंद होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
बनावट शिधापत्रिका तसेच दुबार शिधापत्रिका यामुळे योग्य लाभार्थ्याला शिधापत्रिकेच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे योग्य लाभार्थ्याची ओळख पटण्यासाठी शिधापत्रिकेसोबत आधार जोडणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न आणि पुरवठा मंत्रालयाकडून शिधापत्रिकांसोबत आधार जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेली दोन वर्षे त्यासाठी प्रत्येक रेशन दुकान तसेच तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र टेबल उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र असे असूनही अनेक शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आधार जोडणी केलेली नसल्याचे दिसत आहे.www.konkantoday.com