
रिलायन्सच्या बंदूका बनवणार्या कंपनीसाठी वाटदमधील भूसंपादनाबाबत ४ जुलैपासून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी.
रिलायन्सच्या बंदूका बनवणार्या कंपनीसाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी तालुक्यातील वाटद पंचक्रोशीतील जागेचे भूसंपादन होणार असून याबाबत सुनावणी प्रक्रिया शुक्रवार 4 जुलैपासून उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या कार्यालयात होणार आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात दोन मोठे प्रकल्प आणण्यासाठी मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरु केल्या आहेत. या दोन प्रकल्पांमुळे जवळपास तीस ते चाळीस हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी आणि उंडी रिळ परिसरात सेमीकंडक्टरचा प्रकल्प तर वाटद पंचक्रोशीत बंदूका बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी वाटद, कोळीसरे, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ परिसरातील जागेचा समावेश आहे.
या प्रकल्पासाठी जागेची निश्चितीही करण्यात आली आहे. जागेचे अधीग्रहण केले जाणार असून, महसूल विभागाने यासंदर्भात आता सुनावणी कार्यक्रम जाहीर केला आहे.ग्रामस्थांच्या शंका व समस्या जाणून घेणार आहेत.यासाठी शुक्रवार 4 पासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. कोळीसरे येथून 17 वैयक्तिक अर्जदार असून त्यात 20 खातेदार आहेत. त्यांची सुनावणी सकाळी 11 वाजता तर मिरवणे येथील 10 अर्जदारांची सुनावणी दुपारी 1 वाजता होणार आहे. जिजाऊ संघटनेतर्फेही अर्ज करण्यात आले होते. यातील कोळीसरेतील 102 ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या असून त्यावर 4 वा. सुनावणी होणार आहे.
कळझोंडी येथील 4 ग्रामस्थांनी वैयक्तिक अर्ज केले असून त्यांची सुनावणी सोमवार 7 रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. जिजाऊ संघटनेच्या अर्जावर दु. 4 वाजता सुनावणी होणार आहे यावर 165 ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत. वाटद गावची सुनावणी 8 जुलै रोजी असून 103 ग्रामस्थांनी वैयक्तिक अर्ज केले असून त्यात 176 खातेदार आहेत त्यांची सुनावणी स. 11 वा. होणार आहे. वाटद संदर्भात जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर बुधवार 9 रोजी सुनावणी होणार आहे. या अर्जावर 281 ग्रामस्थांच्या अर्जावर स्वाक्षर्या आहेत. गडनरळ येथील 12 अर्जावर गुरुवार 10 जुलै रोजी 11 वा. सुनावणी होणार असून यात 60 खातेदार आहेत. तर जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर 4 वा. सुनावणी होणार आहे. यावर 73 ग्रामस्थांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.या सर्व अर्जदारांच्या अर्जावर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (3)अन्वये सुनावणी होणार आहे.