
‘लाडकी बहीण’ लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापना मार्गदर्शनसाठी पालक अधिकारी, सहायक नियुक्त.
. रत्नागिरी दि. 2 : महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय देण्यात येत आहे, अशा महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून परिपत्रक पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना याबाबत निकषांची माहिती देण्यासाठी तसेच संस्था स्थापन करण्यासाठी, मार्गदर्शन व सहाय करण्यासाठी पालक अधिकारी तसेच सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गाव तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. गाव कार्यक्षेत्रासाठी 250 सभासद संख्या व दीड लाख भाग भांडवल, नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी 500 सभासद संख्या व 5 लाख भाग भांडवल, तालुका कार्यक्षेत्रासाठी 500 सभासद संख्या व 5 लाख भाग भांडवल आणि जिल्हा कार्यक्षेत्रासाठी दीड हजार सभासद संख्या व 10 लाख भाग भांडवल असणार आहे.
महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून साहेबराव दत्तात्रय पाटील, सहायक निबंधक सहकारी संस्था, (८२७५४५८५४४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) भगवान कोंडीबा आखाडे, (९८६०६९२१५०) दापोली तालुक्यासाठी सहायक निबंधक अनिता बटवाल, (९८२१२८९९९१), खेड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.२) शामल क्षिरसागर, (८४११८२०१२२), चिपळूण तालुक्यासाठी सहायक निबंधक सुशांत घोलप, (९८२०६१२०२३), गुहागर तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) कुमार मनोहर देवरुखकर, (९५२७९५५९४९), संगमेश्वर तालुक्यासाठी सहायक निबंधक, अक्षय भापकर, (७०२०४८७६९०) रत्नागिरी तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) एम. एस. धुमाळ (९९७०२०४०९९), लांजा तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) संतोषकुमार शि.पाटील, (९७६६९३१५८५) व राजापूर तालुक्यासाठी सहायक निबंधक संतोषकुमार शि. पाटील, , (९७६६९३१५८५) यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी ज्या महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेंतर्गत महिलांची नागरी पतसंस्था नोंदवावयाची असेल त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी तसेच तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्रासाठी संबंधित तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था / सहकारी अधिकारी श्रेणी-१ यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.000