
मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या संशयावरून सूड भावनेतून तरुणावर अॅसिड फेकले, मुलीच्या वडिलांची कबुली
दीड महिन्यांपूर्वी आपल्या मुलीच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा राग मनात ठेऊन त्याचा बदला घेण्यासाठी मुलीच्या बापाने ऋषभ शेट्ये या कॉलेज युवकावर अॅसिड हल्ला केल्याचे उघड झाले आहेसोमवारी धारगळ पेडणे-गोवा येथे ही घटना घडली होती. याबाबत संशयित नीलेश गजानन देसाई (47) याला गोवा पोलिसांनी अटक केली असून, हा हल्ला आपणच केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती गोवा- पेडणे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. कॉलेजला जाण्यासाठी धारगळ- सुकेकुळण येथील बसस्टॉपवर उभ्या असलेल्या ऋषभ शेट्ये या विद्यार्थ्यावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना सोमवार, 30 जून रोजी सकाळी घडली होती.
याप्रकरणी गोवा -पेडणे पोलिसांनी कळणे येथील संशयित नीलेश देसाई याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने हा गुन्हा मान्य करत त्या मागची कथा पोलिसांना सांगितली. यानुसार नीलेश देसाई यांची मुलगी शिक्षणासाठी मामाच्या घरी पेडणे तालुक्यात होती. ती व ऋषभ एकाच कॉलेजमध्ये होते. यामुळे दोघांची मैत्री होती. दरम्यान मे महिन्यात मुलगी आजारी पडली व दुर्दैंवाने त्या आजारातच तिचे निधन झाले. मात्र आपल्या मुलीच्या मृत्यूला ऋषभ शेट्ये हा जबाबदार असल्याचा संशय नीलेश देसाईच्या मनात निर्माण झाला. याचा राग मनात ठेवून नीलेश देसाई याने हा हल्ला केला. तशी कबुली नीलेश देसाई याने गोवा -पेडणे पोलिसांकडे दिली आहे. ‘माझ्या मुलीला मृत्यू पूर्वी ज्या वेदना सहन कराव्या लागल्या, तश्या वेदना त्याला व्हाव्यात’ या हेतुने आपण हे कृत्य केल्याचे नीलेश याने गोवा पोलिसांना सांगितले. संशयित नीलेश देसाई हा गोवा- करासवाडा येथे एका खासगी कंपनीत कामाला आहे.