
पालवणी गोसावीवाडी शाळेची संरक्षक भिंत दुरुस्तीचे प्रतिक्षेत
मंडणगड
तालुक्यातील पालवणी गोसावीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत ता.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी मुसळधार पावासामुळे कोसळली. ती अद्यापही दुरुस्त करण्यात आलेली नसल्याने शाळा व उर्वरीत संरक्षक भिंतीसही धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शाळा व ग्रामस्थांच्यावतीने गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व सरपंच यांना भिंती दुरुस्तीकरिता मागणीचे निवेदन ता.३० नोव्हेंबर २०२४ रोजी देण्यात आले होते. त्यातील माहीतीनुसार शाळेच्या पश्चिमेकडील रस्त्यालगतची १४ मीटर इतक्या लांबीची भिंत पावसात कोसळली. तसेच त्याच बाजूची आणखी १४ मीटर इतक्या लांबीची भिंत कोसळण्याचे परिस्थितीत आहे. या भिंतीचे दगड शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर कोसळल्याने इमारतीसही धोका निर्माण झालेला असल्याने निवेदनात नमुद करण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शाळेची संरक्षक भिंत तातडीने बांधून पुर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.