
नाटेतील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नाटे व्यापारी मंडळाची आर्थिक मदत. अपूर्वा सामंत यांचेही खास योगदान : व्यापारी मंडळाचा ‘सपोर्ट’ ठरतोय समाजासाठी आदर्श.
राजापूर : नाटे बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत काही स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नाटे व्यापारी मंडळाने तत्काळ पुढाकार घेत फंड रेसिंगसाठी व्यापाऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये आवाहन केले. अध्यक्ष रमेश लांजेकर व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.संकलित झालेली आर्थिक मदत नुकतीच खालील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना प्रदान करण्यात आली. नारायण गोसावी यांना १ लाखांचा धनादेश, प्रसाद पाखरे यांना ५५ हजारांचा धनादेश, प्रदीप मयेकर यांना २० हजार रुपये रोख, भिम खंडी यांना १० हजार रुपये रोख, दिगंबर गिजम यांना पाच हजार रुपये रोख अशी मदत देण्यातबळी. या मदतीचे वितरण करताना व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण पारदर्शकता राखली असून लाभार्थ्यांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले. व्यापारी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकतेच प्रत्यक्ष त्या बाधित व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि “हेच एक सपोर्ट” ठरावा असा आदर्श घालून दिला.
एकजुटीचा हा उमदा प्रत्यय नाटे गावाला एक वेगळी ओळख देत आहे.विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्त्या अपूर्वा सामंत यांनी या दुर्घटनेत नुकसान झालेल्या एका ब्युटी पार्लर व्यवसायिक तरुणीला संपूर्ण आर्थिक मदतीचे अभिवचन दिले आहे. त्यांच्या या सहवेदना आणि कृतीशील दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान, या दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून आता काय मदत मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. व्यापारी, नागरिक, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की शासनही तत्काळ निर्णय घेऊन योग्य ती आर्थिक मदत जाहीर करेल.या उपक्रमातून नाटे व्यापारी मंडळाने सामाजिक बांधिलकीचे आणखी एक उज्वल उदाहरण साकारले असून, मदतीसाठी पुढे आलेल्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.