
मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस अपेक्षित!
मुंबई :* राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः २ आणि ३ जुलैदरम्यान मुंबईत ९० ते १२० मिमी इतक्या पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात स्थित असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशाच्या सीमेकडे सरकत असून त्यामुळे या प्रणालीचा कोकण किनारपट्टीवर परिणाम होत आहे.
या हवामान बदलामुळे वाऱ्याचा जोरही वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबईच्या उत्तर उपनगरांमधील बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड या भागात तुलनेने अधिक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण मुंबईत पावसाचा जोर तुलनेत कमी असेल. दरम्यान, पालघर जिल्हा आणि पश्चिम घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.*कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकणार*पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आले असून, ते झारखंड आणि परिसरावर आहे. ही प्रणाली हळूहळू पश्चिमेकडे सरकून मध्य भारताकडे येण्याची शक्यता आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून रोहतक, कानपूर, वाराणसी, दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
मुसळधार पाऊस : मुंबई, ठाणे, पालघर
अतिमुसळधार पाऊस :* रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट, सातारा घाट परिसर
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज :* छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर
हलक्या सरींचा अंदाज :* पुणे, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली , नांदेड , लातूर, धाराशिव
जुलैमध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज हावामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने जुलै महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याचबरोबर देशात जुलै महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यात पावसाने सरासरी गाठली. मात्र पावसाचे प्रमाण असमान होते. जुलै महिन्यात मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.