
महावितरणचे आतापर्यंत वीजवाहिन्या, रोहित्रे, शासकीय कार्यालये आणि ग्राहकांकडे मिळून तब्बल 35 लाख स्मार्ट ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) मीटर.
राज्यात वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महावितरणने आतापर्यंत वीजवाहिन्या, रोहित्रे, शासकीय कार्यालये आणि ग्राहकांकडे मिळून तब्बल 35 लाख स्मार्ट ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) मीटर बसवून ते कार्यान्वित केले आहेत.राज्यातील तीन कोटींहून अधिक वीज ग्राहकांना टप्प्याटप्प्याने हे मीटर बसवण्यात येणार असून, या योजनेमुळे वीज बचतीचा आणि सवलतीचा एक नवा अध्याय सुरू होत आहे.आजवर केवळ औद्योगिक ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत आता 1 जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू होणार आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, त्यांना दिवसा, म्हणजेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही सवलत 80 पैशांपासून ते 1 रुपयापर्यंत असेल, ज्यामुळे ग्राहकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.