
आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार
सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता ५ जुलै रोजी विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोघे बंधू एकत्र येणार असून दादरच्या शिवाजी पार्क येथे हा मेळावा होण्याची शक्यता आहे.हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. शिक्षणाच्या विषयात अर्थतज्ज्ञांची समिती नेमली असली तरी कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा इशारा ठाकरेबंधूंनी दिला.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने याविरोधात पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाला. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानिमित्त विजयी मेळावा घेण्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आले. याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दूरध्वनी करून या मेळाव्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. हा मेळावा होणार असला तरी त्यात कोणतेही पक्षीय लेबल लावाचे नाही. हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे. मराठी भाषा या विषयावर कोणकडूनही तडजोड हाेता कामा नये यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी माणसांच्या एकजुटीनंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. पण तरीही सरकारने शिक्षणाच्या विषयात अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांची समिती नेमून शिक्षणाची थट्टा सुरु केली आहे. त्यामुळे कोणाचीही समिती बसवली तरी आता महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना ठणकावले. दरम्यान, ५ तारखेला विजयोत्सव साजरा केला जाणार असून कालच्या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व एकत्र आले होते. तीच एकजूट विजयोत्सवात दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व बाजूने तो रेटा आला. गरज नसताना विषय आले. हा विषय श्रेयवादाचा नाही. सरकार पुन्हा या वाटेला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. मराठीच्या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरु आहे. हे थांबयला पाहिजे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.