दाभोलीत दिवसाढवळ्या स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत. स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा.

माजी आमदार वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी हे दाभोली येथील स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करीत आहेत. दाभोली येथील स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून दिवसाढवळ्या मारहाण होऊनही पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील जमीन हडपलेल्या परप्रांतीयालाच वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील जमीन मिळवून देण्यासाठी निसर्ग ओतारी प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत असून या जमीन व्यवहारात निसर्ग ओतारी यांचे आर्थिक हितसबंध असण्याची शक्यता आहे.त्यामुळे याप्रकरणी निसर्ग ओतारी यांची सखोल चौकशी करून त्यांची बदली करण्याची तक्रार माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच अधिवेशनात यावर आवाज उठविण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले. भाजप महायुती सरकार मधील मंत्री व लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने परप्रांतीय लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक करून येथील जमिनी हडपत आहेत.

परप्रांतीय लोक जिल्ह्यात येऊन स्थानिकांना मारहाण करीत असतील आणि पोलिस निरीक्षक त्यांना सहकार्य करीत असतील तर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यावर कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयावर आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील जमीन हडपण्यासाठी परप्रांतीय पुरुष व महिलांना आणून स्थानिक जमीन मालकांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ व बातमी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. याबाबत तक्रार करूनही वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी याबाबत काहीच कारवाई केली नाही. त्याचबरोबर सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणात ग्रामस्थांचा विरोध असताना देखील जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात त्याठिकाणी जमीन मोजणीची कार्यवाही करण्यात आली त्यावेळी देखील दोडामार्ग पोलिस निरीक्षक म्हणून निसर्ग ओतारी हे कार्यरत होते. त्यामुळे परप्रांतीय व्यक्तीसोबत निसर्ग ओतारी यांचे जमीन व्यवहारात आर्थिक हितसंबध असल्याचा आम्हाला संशय आहे. तरी वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची आपल्या स्तरावर चौकशी करून त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button