
मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष
मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत समोर आला आहे. या घटनेत पाच प्रवासी ठार तर तीन जखमी झाले होते.याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे.
कसारा आणि कर्जत उपनगरी रेल्वे (लोकल) एकाच वेळी समोरासमोर येत असताना कर्जत लोकलमधील पायऱ्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशाचा खांद्यावरील बॅगमुळे तोल गेला. तो खाली पडला आणि त्याच्या धडकेने दुसराही प्रवासी पडला. हे दोघे समोरून येणाऱ्या लोकलवर आदळले. त्यामुळे आठ जण रुळांवर तर पाच प्रवासी डब्यांत पडले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.
मध्य रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांच्या समितीने २१ दिवसांच्या चौकशीनंतर दिलेल्या प्राथमिक निष्कर्षात अपघाताचे कारण प्रवाशाचा तोल जाणे असल्याचे नमूद आहे. दोन्ही गाड्यांचा वेग सुमारे ७५ किमी प्रतितास होता. सीसीटीव्ही चित्रणाद्वारे दुर्घटना कशी घडली हे स्पष्ट झाले आहे.
मुंब्रा स्थानकाजवळील या लोकल अपघाताच्या चौकशीसाठी प्रवाशांकडून माहिती मागवण्यात आली होती. मात्र, केवळ पाच जणांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे समितीच्या हाती फारसे ठोस पुरावे लागले नाहीत. मुंबई रेल्वे पोलिसांनीही स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, अजून पोलिसांचा निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.