
रविवारी सुमारे 40 ते 45 हजाराहून अधिक पर्यटकांची आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गर्दी
आंबोली वर्षा पर्यटन’ हंगामाची यंदा सुरुवात गेल्या रविवारी झाली. त्यानंतर दुसर्या रविवारी सुमारे 40 ते 45 हजाराहून अधिक पर्यटकांनी आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गर्दी केली होती.यामुळे आंबोलीतील सर्वच पर्यटस्थळांवर पर्यटकांची तोबा गर्दी उसळल्याचे चित्र होते. स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या चोख नियोजनामुळे पर्यटकांनी शांतपणे आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला.
दरवर्षी मान्सून दाखल झाल्यावर साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा तसेच घाटातील इतर धबधबे प्रवाहीत होतात. मात्र, यंदा मे च्या दुसर्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पाऊस अखंड कोसळला तर मान्सून मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यातच दाखल झाला. यामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा मे महिन्यातच प्रवाहीत झाला. दरम्यान मधील चार दिवस पाऊसाचा जोर कमी झाला होता. आठवडाभरापूर्वी उस पुन्हा सक्रिय झाल्यानंतर गेल्या रविवारपासून मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला.