आरोग्यसेवा तंत्रज्ञान क्षेत्रातील मेडट्रॉनिक कंपनीने पुण्यात नवीन जागतिक सुविधा केंद्र (जीसीसी) सुरू केले


पुणे : आरोग्यसेवा तंत्रज्ञान क्षेत्रातील मेडट्रॉनिक कंपनीने पुण्यात नवीन जागतिक सुविधा केंद्र (जीसीसी) सुरू केले आहे. या केंद्रासाठी पुढील पाच वर्षांत ५ कोटी डॉलर (सुमारे ४०० कोटी रुपये) गुंतवणूक केली जाणार आहे. केवळ मधुमेही रुग्णांना या केंद्राच्या माध्यमातून सेवा दिली जाणार असून, एकाच आजाराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेले हे एकमेव केंद्र असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मेडट्रॉनिककडून मधुमेही व्यक्तींना नाविन्यपूर्ण उपचारांची सेवा दिली जाते. त्यात त्यांच्या आजाराचे व्यवस्थापन, विमा यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. या नवीन जागतिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून मधुमेहींनी एकत्रित सेवा दिल्या जातील. या केंद्रात पहिल्या वर्षात तीनेशेहून अधिक सेवा आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील रोजगार निर्माण होतील. पुढील चार वर्षांमध्ये या रोजगार निर्मितीत दुपटीने वाढ केली जाणार आहे. या केंद्रात ग्राहक सेवा, प्रगत विश्लेषण, डिजिटल तंत्रज्ञान आदी विभागांचा समावेश आहे. तसेच आर्थिक सेवा व कार्यचालनालाही हे केंद्र पाठबळ देणार आहे.

याबाबत मेडट्रॉनिक डायबेटिसच्या जागतिक सुविधा केंद्राचे संचालक विजेंद्र सिंग म्हणाले की, जगभरात मधुमेहींच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने या केंद्राची वाटचाल असेल. यामुळे आरोग्य सेवेतील प्रगतीला चालना देण्यासोबत अधिक रोजगार संधी निर्माण होतील. पुण्यात तंत्रकुशल मनुष्यबळ असल्याने हे केंद्र सुरू करण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आली. भविष्यात या केंद्रात मधुमेहाविषयी संशोधन आणि विकास हा विभागही सुरू करण्याचे नियोजन आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button