
मुंबई गोवा महामार्गावर वांद्री येथे संरक्षक भिंत कोसळून सोमेश्वर मंदिरात चिखलाचा कहर.
मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री भागात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंदिरालगतची संरक्षक भिंत कोसळल्याने दगड आणि चिखलाचा ओघ थेट ऐतिहासिक सोमेश्वर मंदिरात घुसला असून, त्यामुळे भाविकांसाठी मंदिरात प्रवेश करणेही अशक्य झाले आहे.वांद्री येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने बनवलेला तात्पुरता रस्ता (डायव्हर्जन) नीट नियोजन न केल्यामुळे परिसरात चिखल आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. विशेषतः, मंदिराजवळील नाल्याला अडथळा होऊन पाणी साचल्याने भिंतीवर दाब वाढला. परिणामी, सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसात ती भिंत कोसळून मंदिरात चिखलाचा ढिग साचला.शनिवारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात गेलेल्या गुरवांना ही परिस्थिती दिसून आली. मंदिराची अवस्था पाहून गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. ठेकेदाराने यापूर्वी सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.