
रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्याचा टेहळणी अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी ग्रामस्थांच्या जिल्हाधिकार्यांसह बंदर विभाग, नगर परिषदेकडे तक्रारी.
रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्याचा टेहळणी बुरुज पेठकिल्ला येथील समुद्रात आहे. या बुरुजाच्या अवतीभवती झालेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांसह बंदर विभाग, नगर परिषदेकडे तक्रारी केल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रातून जहाजाद्वारे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा टेहळणी बुरुज बांधण्यात आला होता. बुरुज दुर्लक्षित राहिल्याने त्याचीही अवस्था फारच दयनिय झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला बांधण्यात आला. या किल्याच्या खाली तिन्ही बाजूने अरबी समुद्र आहे. किल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याच्या समुद्रकिनारी बाजारपेठ होती. या समुद्रातून जहाजे किंवा गलबताद्वारे व्यापार होत होता. या समुद्र मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्रातच टेहळणी पानबुरुज बांधण्यात आला होता. अशा या ऐतिहासिक बुरुजाच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु कारवाईबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढतच गेल्याने पुन्हा एकदा स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत.