‘नीट’मध्ये महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र !

मुंबई : राष्ट्रीय चाचणी कक्षाने वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर केला असून यंदा महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर सर्वोच्च १० विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील २ विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी या विद्यार्थ्याने देशातून तिसरा आणि आरव अग्रवाल याने देशातून दहावा क्रमांक पटकावला आहे.

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेसाठी (नीट २०२५) महाराष्ट्रातून एकूण २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर गतवर्षी २०२४ साली एकूण २ लाख ८२ हजार ५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ७५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ लाख ४२ हजार ८२९ विद्यार्थी पात्र ठरले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत १७ हजार १०२ ने घट झालेली आहे.

दरम्यान, सर्वोच्च गुण पटकावणाऱ्या २० मुलींच्या यादीत महाराष्ट्रातील सिद्धी बढे या विद्यार्थिनीने तिसरा (नीट क्रमांक २६), उर्जा शहा हिने पाचवा (नीट क्रमांक ३१), इश्मित कौर हिने बारावा (नीट क्रमांक ८५) क्रमांक पटकावला आहे. तर सर्वोच्च २० मुलांच्या यादीत महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी या विद्यार्थ्याने तिसरा (नीट क्रमांक ३), आरव अग्रवाल याने नववा क्रमांक (नीट क्रमांक १०) आणि उमेद खान याने एकोणिसावा (नीट क्रमांक २१) क्रमांक पटकावला आहे. तर यंदा ‘नीट’ परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि वैद्यकीय पूरक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून (एनटीए) नीट घेतली जाते. यंदा ४ मे रोजी देशातील आणि विदेशातील ५४६८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शनिवार, १४ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी https://neet.nta.nic.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. दरम्यान, परदेशात अबूधाबी, दुबई, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, कुआलालंपूर, कुवेत, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर या देशांमध्ये नीटचे परीक्षा केंद्र होते. इंग्रजीसह हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, मल्याळम, उडीया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू अशा तेरा माध्यमांमध्ये नीट घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button