
आरे वारे समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात बुडणाऱ्या अति उत्साही पर्यटकांना स्थानिकानी वाचवले
रत्नागिरी तालुक्यातील आरे येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले तिघेजण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. बुडालेल्या तिघांना समुद्रकिनारी असलेल्या स्थानिकांनी जीवाची बाजी लावत वाचवले.
आरेवारे समुद्रकिनारी मागील काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता अनेक पर्यटक उधाण आलेल्या समुद्रात उतरत आहेत. याचाच फटका रविवारी सायंकाळी तीन पर्यटकांना बसला. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरे समुद्रात तिघे पर्यटक भिजण्यासाठी उतरले होते. याच दरम्यान समुद्राला आलेल्या भरतीने निर्माण झालेल्या भोवऱ्या मुळे तिघेही पर्यटक समुद्रात ओढले गेले. समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच तिघांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या श्रेयस पवार, अर्पित भोसले, सुरज चव्हाण, ओंकार सागवेकर, आदित्य पाटील, पोलिस पाटील आदेश कदम, श्लोक पाटील आणि सुयोग भाटकर यांनी तत्काळ धाव घेत बुडणाऱ्या तिघांनाही जीवदान दिले.