
बावनदी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी बावनदी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. आज सकाळी झालेल्या या भीषण अपघातात सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून शिक्षकांचे प्राण बचावले आहेत मात्र दुर्घटनेत सुमारे 25 शिक्षक जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच या प्रशिक्षणातील दर तासाला असलेल्या हजेरी बाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे की कैद्यांसाठी, असा सवाल कोकण विभागाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपस्थित केला होता. प्रशिक्षणाला पाच मिनिटे उशीर झाल्यास तुम्हाला प्रशिक्षणातून बाहेर काढले जाईल यावरही आक्षेप घेण्यात आला होता मात्र आता आज अपघात झाल्यानंतर या अपघातात कोणाच्या कमी जास्त झाल्यास कोण जबाबदारी घेणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सागर पाटील, अध्यक्ष कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी यांनीही याबाबत दोन दिवसांपूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, इतिहासात प्रथमच या प्रशिक्षणाला शिक्षकांची दर तासाला हजेरी घेतली जात आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे की कैद्यांसाठी, असा प्रश्न केला जात आहे.तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणस्थळी यायला पाच मिनिटे उशीर झाल्यास संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणातून बाद करण्यात येईल असा फतवा काढण्यात आला होता.