राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ


रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आजपासून येथे सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती सुखदा सुभाष देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेकरिता भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. देव यांच्या कन्या गायत्री बेहेरे, आमदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिनिधी धनंजय मराठे, महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, डॉ. होनप, जे. के. भोसले, अनिरुद्ध संझगिरी आदी मान्यवर उपस्थित होते. चिंतामणी दामले यांनी सूत्रसंचालन केले.

या स्पर्धेत मुंबई, गोवा, पुणे, बेळगाव, कोल्हापूर, राजापूर, देवगड, सावंतवाडी व यजमान रत्नागिरीमधील २१ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा संचालक म्हणून दक्षिण दास आणि राजीव देव काम पाहत आहेत. दिवसभरात डुप्लिकेट ब्रिजच्या प्रत्येकी ८ बोर्डाच्या सहा फेऱ्या खेळवल्या गेल्या. यामधून गोल्डन ग्रुपसाठी संघ निवड करण्यात आली. उद्या रविवारी पात्र संघांमध्ये ऑल टू प्ले ऑल या पध्दतीने सामने होतील व विजेते जाहीर होतील. राहिलेले संघ पुन्हा लीग मॅच खेळतील व त्यांच्यातूनही तीन नंबर काढले जातील. स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी सायंकाळी होणार असून विजेत्यांना पन्नास हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे.

ब्रिज असोसिएशनमध्ये डॉ. देव कार्यरत होते. त्यामुळे देव कुटुंबियांकडून असोसिएशनला नेहमीच सहकार्य केले जाईल, असे या वेळी गायत्री बेहेरे यांनी सांगितले. तसेच डॉ. देव यांची स्मृती जपल्याबद्दल आभार मानले. ब्रिज हा जागतिक दर्जाचा पत्त्यांचा खेळ आहे. ऑलिंपिकमध्येही या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यस्तरीय स्पर्धांकरिता महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनतर्फे डेल्ट मशिन व ब्रिज मेटची सुविधा देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हेमंत पांडे यांनी याप्रसंगी जाहीर केले. असोसिएशनच्या स्थापनेपासून कार्यरत व विद्यमान अध्यक्ष मोहन दामले यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button