गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार


मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांमधून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यात सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्थानकात असलेल्या आरक्षण तिकीट खिडक्यांच्या संख्या गर्दीच्या काळात कमी पडत आहे.याची दाखल घेत, गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहेत. यामुळे गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय. नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासिय ठाणे, मुंबई आणि उपनगरांत स्थायिक झाले आहेत. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात.

ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले ४ वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे ७ मे २०२५ रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला.

या पत्राची तातडीने दखल घेत २ जून २०२५ रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे २ अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरु करत असल्याची माहिती दिली आहे. २० जून २०२५ ते ५ जुलै २०२५ या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु राहणार आहेत. सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून २ अतिरिक्त खिडक्या सुरु होणार आहेत.

त्यामुळे आता आरक्षण खिडक्यांची संख्या ६ होणार असल्याने कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या खासदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button