
शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांग्लादेशी जन्मदाखलाप्रकरणी ग्रामविकास अधिकार्यावर आरोपपत्र
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांग्लादेशात जन्म झालेल्या व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचा मुद्दा उघड झाला होता. या प्रकरणी ग्रामविकास अधिकार्याला निलंबित करण्यात आले होते. आता त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असून जि.प. ग्रामपंचायत विभागामार्फत आरोपपत्राची बजावणी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
बांग्लादेशात जन्म झालेल्या एकाची जन्मतारीख १ मे १९८३ होती. त्याने शिरगाव ग्रामपंचायतीकडे जन्मदाखला मागितला. संबंधिताच्या मागणीनुसार २०२० साली हा दाखला दिल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात आढळले. मूळ बांग्लादेशी असलेल्या एका नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे रत्नागिरीतील जन्मदाखला असल्याची माहिती उघड झाली. मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने आणखी तपास सुरू करण्यात आला. त्यावेळी नजर चुकीने दाखला दिल्याची भूमिका घेण्यात आली.
या सार्या प्रकाराची गंभीर दखल तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतली. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
www.konkantoday.com