राजकारणातून त्यांच्यासाठी आभाळ फाटलेलं आहे, कितीही ठिगळ लावलं तरी आता जमणार नाही- रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका


गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधुंच्या एकत्रि‍करणाच्या चर्चेला आता तरी पूर्णविराम मिळणार का, असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यातच, या चर्चांसदर्भात उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलंय. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता, यावर सर्वच बाजुंनी प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही काँग्रेससोबत गेला हे जनतेच्या मनात होतं का? अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत.

मला उद्धव ठाकरे यांना साधा प्रश्न विचारायचा आहे. स्व. बाळासाहेबाच्या विचारांविरोधात जाऊन तुम्ही काँग्रेससोबत गेला, हे जनतेचे मनात होतं का? आधी ते सांगा, असे म्हणत शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. आता उद्धव ठाकरेचं सगळं संपलं असल्यामुळे राजकारण केलं जात आहे. लाचार होऊन गुडघे टेकून राज ठाकरे कधी येतात आपल्याकडे असा विचार त्यांच्या कुटुंबीयांचा सुरू आहे. ते सातत्याने टाळी देतात, हात देतात, मात्र राज ठाकरेंकडून त्याना प्रतिसाद मिळत आहे का नाही? राजकारणातून त्यांच्यासाठी आभाळ फाटलेलं आहे, कितीही ठिगळ लावलं तरी आता जमणार नाही, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

राज ठाकरेंना सोबत घेऊन पक्षात काही बळकटी येऊ शकते का असा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. पण, राज ठाकरे त्याला भीक घालतील असं मला वाटत नाही. उद्या समजा दोन्ही पक्ष एकत्र आले, दोन्ही पक्ष एकत्र येणार की त्यामध्ये एखादी पक्ष विलीन होणार? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंची भूमिका कट्टर हिंदुत्त्ववादी आहे, भोंगे बंद करण्याची आहे. मग काँग्रेससोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना किंवा काँग्रेसला हे भोंगे बंद करण्याची भूमिका चालेल का? याचा कोणी विचार केला आहे का? उद्या दोघांची युती झाली तर, युतीमध्ये मोठा भाऊ कोण असेल? ह्या अनेक गोष्टी जर तर वरच आहेत. जेव्हा आवश्यकता होती, तेव्हा राज ठाकरेंनी हात पुढे केले होते, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते एका म्यानमध्ये दोन तलवार राहत नाहीत, याचा मी साक्षीदार आहे. मग, उद्धव ठाकरेंना आता अचानक काय झालं, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
तुमचं कौटुंबिक नातं जपायचं होतं तर मग राज ठाकरेंच्या मुलाला तुम्ही का पाडला? आदित जेव्हा वरळीमधून उभा होता तेव्हा राज ठाकरेंनी त्याला पाठिंबा दिला होता. पण, राज ठाकरेंचा मुलगा जेव्हा उभा होता, त्याला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा न देता त्याला पाडलं. राज ठाकरे हे विसरतील का? असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे आपला सोयीनुसार राज ठाकरे यांचा वापर करत आहेत. कारण, आज उद्धव ठाकरेंजवळ सर्व संपलेलं आहे. आणखी वर्ष दीड वर्षांत अतिशय वाईट अवस्था राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची होणार आहे. म्हणून जबरदस्तीने राज ठाकरेंच्या पाठिमागे पडले आहेत. जनतेचा मनात जे आहे ते होणार म्हणतात, पण तुमच्या मनात जे होतं ते का केलत? असा सवालही कदम यांनी विचारला. राज ठाकरे विचारवंत माणूस आहेत, ते योग्यवेळी योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button