
गोव्यातील वास्को येथून नियमित बेलापूर येथे रेती वाहतूक करणारे बार्ज नादुरुस्त झाल्याने रनपार किनारी
गोव्यातील वास्को येथून नियमित बेलापूर येथे रेती वाहतूक करणारे बार्ज बुधवारी रात्री 8.00 वा. सुमारास रनपारनजिकच्या खोल समुद्रात नादुरुस्त झाले. बार्जमधील बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण झाल्याने बार्जसह टग किनाऱ्याजवळ उभा करून ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला.
रनपार समुद्रात भलेमोठे बार्ज उभे असल्याचे किनाऱ्यावरी सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कोस्टगार्ड, कस्टम या यंत्रणांना या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर कोस्टगार्डने आपल्या यंत्रणांच्या सहाय्याने बार्जची माहिती घेतली. संबंधित बार्ज एका मराठी व्यावसायिकाचे असून, रेती घेऊन ते बेलापूर येथे जात होते. समुद्राला उधाण आल्यामुळे वातावरणातील बदलाचा फटका बार्जला बसला. बॅटऱ्यांमध्ये बिघाड झाल्याने बार्ज एकाच ठिकाणी नांगर टाकून उभे करून ठेवण्यात आले आहे.
तांत्रिक दुरुस्ती करणारे पथक बेलापूर येथून शुक्रवारी रनपार येथे दाखल होणार आहे. याचदरम्यान कस्टम, कोस्टगार्ड, पोलिस शुक्रवारी बार्जची पाहणी करणार आहेत.