
हुंडा अन् लग्नातील इतर गोष्टीवर मराठा समाजाने पुरोगामी पाऊल उचलले
हुंडा अन् लग्नातील इतर गोष्टीवर मराठा समाजाने पुरोगामी पाऊल उचलले आहे. मराठा समाजाने लग्न समारंभांसाठी नवीन आचारसंहिता लागू केली आहे. नगरमध्ये त्यासाठी विशेष बैठक बोलवण्यात आली होती. ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर या बैठकीसाठी उपस्थित होते.
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर खडबडून जागं झालेल्या मराठा समाजामधील लोकांनी अहिल्यानगरात बैठक घेत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. लग्न साध्या पद्धतीने आणि १०० ते २०० लोकांमध्ये करा, हुंडा प्रथा बंद करा, प्रिवेडींग शूट बंद, यासारखे नियम आचारसंहितेत ठरवण्यात आले आहे. या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ११ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाजातील लग्न समारंभ साधे, कमी खर्चाचे आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारे असावेत, असा या निर्णयामागील उद्देश आहे. या नियमांचे पालन न केल्यास सामाजिक बहिष्काराची कारवाई होऊ शकते, असे समितीने स्पष्ट केले आहे. यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल आणि आर्थिक ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या आचारसंहितेला समाजातील सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.