राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस ! हवामान तज्ज्ञ डाॅ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज! !


राज्यात यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डाॅ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. हवामान बदलामुळे खंडात्मक पर्जन्यमानात मोठे बदल झाले आहेत.

काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस असा मान्सून असल्याने शेतकऱ्यांनी पीक पेरणी पद्धतीत बदल करण्याचे आवाहन त्यांनी केले.’राज्यातील कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर येत्या चार महिन्यांत राज्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता आहे. दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे.’ असे डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होत असल्याने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीतच बदल करण्याची गरज आहे. राज्य सरकारने बी, बियाणे, खते यांचे वितरण, उपलब्धता याची स्वतंत्र व्यवस्था करावी. शेतकऱ्यांनीही अशा बदलाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे.’ असे डाॅ. साबळे म्हणाले.

‘जगातील प्रत्येक खंडातील वनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात नाश होत चालला आहे. प्रतिवर्ष १० दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र घटत आहे. ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे. अवेळी पाऊस, ठरावीक कालावधीत प्रमाणापेक्षा जास्त पाऊस, समुद्राला वारंवार भरती, बर्फ वितळणे, मोसमी वाऱ्यांचा प्रवाह थांबल्याने बाष्पीभवनावर परिणाम अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे,’ असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

विभागनिहाय पावसाचा अंदाज

राज्यात पश्चिम विदर्भ विभागात सरासरीच्या १०५ टक्के, पूर्व विदर्भ आणि मध्य विदर्भ विभागात सरासरीच्या १०० टक्के, मराठवाडा विभागात सरासरीच्या ११० टक्के, कोकणात सरासरीच्या १०६ टक्के, उत्तर महाराष्ट्रात १०४ टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या १०८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा पुणे विभागात सरासरीच्या ११५ टक्के पडण्याचा अंदाज असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button