नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलली: एनबीईने केली घोषणा !

नवी दिल्ली :* राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (नीट पीजी) २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीई) सोमवारी केली. १५ जून रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळा(एनबीईएमएस) ने जारी केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे. दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एनबीईने घेतला असल्याचे सूचनेत म्हटले.

अगोदरच्या अधिकृत वेळापत्रकानुसार २ जून रोजी नीट पीजी परीक्षेसाठी ॲडव्हान्स्ड सिटी इंटिमेशन स्लिप जारी करण्याचे नियोजित केले होते. तथापि, आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे, सिटी स्लिप, नीट पीजी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आणि परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी एनबीईच्या अधिकृत संकेतस्थळावरुन त्यांचे हॉल तिकिट पाहू शकतील, असे परीक्षा मंडळाने सूचनेत म्हटले आहे.दरम्यान, देशभरातून एकूण २.४ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचे आणि संपूर्ण पारदर्शकता राखण्याची खात्री करण्याचे निर्देश न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला शुक्रवारी (३० मे) दिले आहेत. एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी अधिक परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा मंडळाने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button