
आंबोलीचा धबधबा 5 नंतर राहणार बंद, अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय.
पावसाळा सुरू होताच आंबोली घाटात पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली धबधब्यावर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत असतात. मात्र, आता वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.पावसाळ्यात धबधबा परिसरात दृष्यमानता कमी होत असल्याने आणि अपघातांचा धोका वाढत असल्यामुळे प्रशासनाने खालील उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद आणि महादेवगड पॉईंट या ठिकाणी शनिवार आणि रविवार सायंकाळी ५ वाजल्यानंतर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.
सायंकाळी ५ वाजता परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार असून, त्या वेळेनंतर कोणालाही वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. धबधबा परिसरातील सर्व स्टॉल्सही सायंकाळी ५ वाजता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोली घाटातील काही भागांत पावसामुळे धुके आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी असलेल्या भागांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश वेळोवेळी दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.