
वैष्णवीच्या बाळाचे संगोपन तिची आई स्वाती कस्पटे करणार; बाळाचा सांभाळ करण्यासाठी स्वाती कस्पटे यांची योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती –मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती.
पुणे:—पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, नणंद, सासू, सासरा आणि दीर यांना अटक केली आहे. दरम्यान, आईविना पोरका झालेल्या वैष्णवीच्या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. याचा निर्णय आता बालकल्याण समितीने घेतला आहे.
*वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा ९ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बालकल्याण समितीने त्याची आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केलं आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे.
याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल, असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.*