
दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी चाकरमान्यांनी पुन्हा दंड थोपटले.
कोरोनाच्या संकटानंतर बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी मुंबई-पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. कोकण विकास समितीकडूनही पॅसेंजर सुरू करण्यासाठी पत्रव्यवहाराचा सपाटा सुरूच आहे. मात्र रेल्वे प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने नाराजीचा सूर आहे.पूर्वीची ५०१०४/५०१०३ क्रमांकाची दादर-रत्नागिरी पॅसेंजर आता दिवा-रत्नागिरी पॅसेंजर झाली आहे. कोरोना काळात पॅसेंजरला लागलेला ब्रेक अजूनही कायम आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचा प्रवास करताना विशेषतः पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोकण विकास समिती जल फाऊंडेशन व प्रवासी संघटना दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापही पाठपुराव्याला यश आलेले नाही. मुंबईतील पश्चिम उपनगरात वास्तव्य असलेल्या चाकरमान्यांना पॅसेंजर पकडून होणारे हाल या बाबतही वस्तुस्थिती सातत्याने मांडली जात आहे. मात्र तरीही अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी पुन्हा दंड थोपटण्यास सुरूवात केली आहे.www.konkantoday.com