
सोशल माध्यमाद्वारे मुलीला ब्लॅकमेल करणारा मुंबई येथून अटक. खेड पोलिसांची कामगिरी
रत्नागिरी : गेले सहा महिने एका मुलीला सोशल माध्यमाद्वारे तसेच फोन करून त्रास देणाऱ्या एकाला खेड पोलिसांच्या पथकाने २८ मे रोजी वसई, मुंबई येथून ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही जप्त केला आहे. कृष्णकांत सुभाष वैध (वय २८, रा. रूम नं. ०३, वेदय चाळ, पोसपोली गाव, साखीविहार रोड, निती पवई) असे त्याचे नाव आहे. याच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२४ ते २४ एप्रिल २०२५ रोजी या कालावधीत अज्ञात आरोपी याने फिर्यादीच्या व्हॉटसॲप मोबाईल क्रमांकावर अश्लील मेसेज करून, तसेच फिर्यादीला वारंवार फोन करून त्यांचा ऑनलाईन छुपा पाठलाग करून, फिर्यादीना अश्लील शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सोशल माध्यमाचा वापर करत फिर्यादीचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट काढून त्याद्वारे फिर्यादी यांचे फोटो व्हायरल करून त्यांना ब्लॅकमेल केले.
याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६, (ई) ६७ प्रमाणे २१ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागौजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पांडुरंग भोयर हे नेमणूकी तपास पथकासह या गुन्ह्याचा तपास करीत होते.या गुन्ह्यातील आरोपीचा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करता या गुन्ह्यातील आरोपी हा निती वसई मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी तपास पथक पाठवून शिताफीने एका इसमास पकडून त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये कृष्णकांत सुभाष वैध (वय २८, रा. रूम नं. ०३, वेदय चाळ, पोसपोली गाव, साखीविहार रोड, निती पवई) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला २८ मे रोजी वसई मुबंई येथून ताब्यात घेण्यात आले असून, आज २९ मे अटक करण्यात आले आहे. अटकेदरम्याने आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.ही कामगिरी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पांडुरंग भोयर, पोहेकॉ दीपक गोरे, पोकों अजय कडू, पोका राम नागुलवार, पोकों वैभव ओहोळ, पोहेकॉ रमिज शेख (टेक्निकल ॲनालिसिस विंग) यांनी केली.