
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शालेय शिक्षण विभागाकडून नवीन आदेश जारी.
बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यातील सर्वच शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शालेय शिक्षण विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार आता राज्यातील सर्वचं शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी होणार आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता सर्वच शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशी तीन वेळा शालेय विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार अशी माहिती शालेय विभागाच्या आदेशातून समोर आली आहे.महत्वाची बाब म्हणजे या हजेरीत जर एखादा विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले तर अशा प्रकरणात त्याच्या पालकांना तात्काळ एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढणार आहे तसेच त्यांची सुरक्षितता देखील सुनिश्चित होईलफक्त दिवसातून तीन वेळा हजेरी घेतली जाईल असे नाही तर शाळेतील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले जाणार आहेत.
वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने आणि स्वच्छतागृहांबाहेर कॅमेरे बसवले जातील अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून समोर आली आहे.एवढेच नाही तर शाळेत जे कॅमेरे बसवले जातील त्या कॅमेर्यांचे मागील एक महिन्याचे फुटेज बॅकअप ठेवणेही शाळेच्या समितीसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळेत जे कर्मचारी नेमले जातील त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करतानाही विशेष सावधानता बाळगली जाणार आहे.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना पोलिस चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पोलीस चारित्र्य पडताळणी मध्ये जे लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीवाले असतील त्यांची सेवा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येणार आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता सर्वच शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, पाण्याची सोय आणि आपत्कालीन परिस्थितीत वाजणारी घंटा या अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तसेच विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येऊ नये, त्यांना नैराश्याचा सामना करावा लागू नये यासाठी मध्ये राज्याच्या प्रत्येक शाळेत समुपदेशक नेमण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.