
कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. शेखर निकम यांची सरकारकडे मागणी.
कोकणात मान्सूनपूर्व आलेल्या पावसात भात व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. शासनाने शेतकर्यांना मदत देवून त्यांना आधार द्यावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे यांच्यासह कृषी मंत्र्यांकडे केली आहे.आमदार शेखर निकम यांनी राज्य शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा हवामानाच्या अनियमितपणामुळे पाऊस सुरू झाला आहे. यामुळे विविध समस्या उदभवल्या असून यावर तातडीने शासन पातळीवर उपाययोजना होणे आवश्यक आहे. कोकणातील भात पीक हे मुख्य पिक असून अवेळी आलेल्या सलग पडणार्या पावसामुळे शेतकर्यांना भात पेरणी करणे अशक्य झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीची मशागत होण्याआधीच अतिवृष्टी झाल्यामुळे रोपांची पेरणीच झालेली नाही. यामुळे हजारो शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू शकते. शासनाने त्वरित परिस्थितीचा आढावा घेवून कोकणातील शेतकर्यांकरिता ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्यांना आर्थिक मदत व विम्याची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.www.konkantoday.com