
किल्ले रायगडावरील पायरी मार्गाच्या दुरूस्तीसाठी २८, २९ मे रोजी पायरी मार्ग बंद राहाणार.
महाड किल्ले रायगड पायरी मार्गावरील कड्यांमधून सुटलेले दगड काढण्याच्या कामासाठी २८ आणि २९ मे रोजी रायगड पायरी मार्ग शिवभक्तांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले आहेत. या काळात गडावर जाण्यायेण्यासाठी केवळ रोप वेचा वापर करता येणार आहे.६ जून रोजी तारखेनुसार आणि ९ जून रोजी तिथीनुसार रायगडवर शिवराज्याभिषेक सोहोळा साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही सोहोळ्यांना शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडवर उपस्थित राहणार आहेत. २०२३ मध्ये या सोहोळ्याच्या वेळेस पायरी मार्गावर कड्यातून सुटलेला दगड पायरी मार्गावर पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कड्यातून सुटलेले दगड काढण्याचे काम दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहोळ्यापूर्वी करण्यात येते. यावर्षी २८ आणि २९ मे रोजी हे दगड काढण्याचे काम करण्यात येणार आहे.कार्यकारी अभियंता (विशेष पथक, रायगड किल्ला) हे काम दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या प्रशिक्षित रॅपलर्सकडून पोलीस बंदोबस्तात करुन घेणार आहेत. या दोन दिवसात पायरी मार्गाचा वापर शिव भक्तांनी करू नये केवळ रोप वेचा वापर करावा असे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढले आहेत.www.konkantoday.com