
रत्नागिरी शहरातील आझादनगर येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून राडा
रत्नागिरी शहरातील आझादनगर येथे रस्त्यावर केक कापण्यावरून जाेरदार राडा झाला. यावेळी तरुणाच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. माेहम्मद शेख समीर काझी (25) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या नातेवाईकांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाेलिसांनी 16 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आफताब शहबान बलबले, शादाब बलबले, साहिल बावानी, शहबाद गनी बलबले, नवाज, अरबाज व अन्य 10 ते 12 जणांवर शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आराेपी है 17 मे राेजी आझादनगर बसस्टाॅप येथे रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास अफताब बलबले याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले हाेते.
याठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करत असताना तक्रारदार माेहम्मद काझी हा त्याठिकाणी आला. माेहम्मद याने संशयिताना तुमचे याठिकाणी काम चालले आहे, अशी विचारणा केली. याचा राग आल्यान संशयित आराेपींनी रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, अशी विचारणा केली. रागाने संतप्त झालेल्या आफताब याने तक्रारदार याच्याकडे इशारा करत ’यानेच माझ्या काकाला अडकविले आहे, पाेलिसांना यानेच टीप दिली हाेती, याला साेडू नका‘ असे बाेलू लागला. त्यानंतर केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने माेहम्मद काझी याच्या छातीवर दाेन वार केले. त्याचबराेबर अन्य संशयित आराेपी यांनी काझी याच्या डाेक्यात लाेखंडी सळी मारून दुखापत केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.www.konkantoday.com