
मुंबईत पावसाच्या सरी! राज्यातही वादळी पावसाचा इशारा!!
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागात शनिवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. विशेषत: उपनगर परिसरात पावसाची नोंद झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत सरी कोसळल्या. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. वांद्रे, पवई, दादर, वरळी या भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. आज मुंबईत काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर राहील. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण असेल. दरम्यान, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम
नैऋत्य मोसमी वारे ‘जैसे थे’
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही वाटचाल केली. शुक्रवारी मोसमी वाऱ्यांची वाटचाल ‘जैसे थे’ होती. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.
वळिवाचा आणि मोसमी पाऊस
पूर्वमोसमी म्हणजेच वळिवाच्या पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते. हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
वळिवाच्या पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे-पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
पूर्व मोसमी पावसाचा जोर अधिक राहणार
पुढील पंधरा दिवस म्हणजेच ३१ मेपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होईपर्यंत कोकण किनारपट्टी तसेच संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई समोर अरबी समुद्रात केंद्र असलेले एक व तेलंगणा राज्यावर केंद्र असलेले असे दुसरे अशा दोन आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची ही शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यात वळिवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.