
कोकण रेल्वेकडून प्रलंबित प्रश्न सुटल्याशिवाय वाशिष्ठीचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, शौकतभाई मुकादम यांचा इशारा.
. दिल्लीतील एका कपंनीने वाशिष्ठी पुलाजवळ पाणी व जॅकवेल बांधण्याची टेस्टिंग चालू केली आहे. याकरीता गेले दोन महिने कंपनीचे काही लोक कळंबस्ते हायस्कूल स्मशानभूमी जवळ काम करत आहेत. कोयना व वाशिष्ठीचे पाणी रेल्वे पटरीच्या बाजूने मुंबई व राजापूर-नाणार प्रकल्प येथे नेण्यात येणार असल्याचे समजते. त्यानुसार या कामाच्या सर्व्हेला सुरुवात झालेली आहे. मात्र जोपर्यंत कोकण रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्या जात नाही तोपर्यंत आम्ही वाशिष्ठीचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, असा रोखठोक इशारा कोकण रेल्वे निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. यामुळे वाशिष्ठीच्या पाण्याचा विषय पेटण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना श्री. शौकतभाई मुकादम पुढे म्हणाले की, चिपळूण-कराड रेल्वे मार्ग, चिपळूण-दादर स्वतंत्र गाडी, वंदे भारतसह काही गाड्यांना चिपळूणला थांबे, अशी आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय वाशिष्ठी नदीचे पाणी व त्या ठिकाणी बांधण्यात येणारी मोठी जॅकवेल व बंधार्याचे काम आम्ही होऊ देणार नाही. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करु नका, असेही श्री. मुकादम यांनी ठणकावून सांगितले आहे.www.konkantoday.com