डॉ. श्रीपाद कोदारे यांना सर्वोदय पुरस्कार प्रदान.

रत्नागिरी : प्रत्येकाने आपल्या सेवेशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणे म्हणजे सामाजिक ऋण फेडणे. प्रत्येकाने समाजकार्यासाठी पैसेच दिले पाहिजे, असे नाही. मात्र आपल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्या होणे हीसुद्धा एक समाजसेवा आहे. सर्वोदय छात्रालयातून बाहेर पडलेल्या अनेकांची नाळ सामाजिक कार्यात जोडलेली आहे, याचे श्रेय माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनाच जाते, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद कोदारे यांनी केले.यमुनाबाई खेर ट्रस्टच्या छात्र- मित्र मेळाव्यात हरिश्चंद्र गीते व श्रीमती गीते यांनी पुरस्कृत केलेला दुसरा सर्वोदय पुरस्कार डॉ. कोदारे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यात आणखी पाच हजार रुपयांची भर घालून डॉ. कोदारे यांनी ट्रस्टला देणगी दिली.

ते म्हणाले की, पू. अप्पासाहेब पटवर्धन, बाळासाहेब खेर, मोरोपंत जोशी, शामराव पेजे आदी महात्म्यांच्या पुण्याईचा वारसा लाभलेल्या सर्वोदय छात्रालयाचा छात्र होण्याचे भाग्य मला लाभले. १९८० ते ८४ या कालावधीत छात्रालयात होतो. त्यावेळी श्री. खानविलकर, सुनील तिखे, सदानंद कळंबटे, रघुवीर शेलार असे अनेक मित्र मिळाले. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी गीते सरांचे मार्गदर्शन कोणताही विद्यार्थी चुकवत नसे. इथला विद्यार्थी नीतीमूल्य जपतोय. शिक्षक, वकिल, डॉक्टर, सरकारी अधिकारी, व्यापारी अशा अनेक ठिकाणी कार्यरत आहे. याप्रसंगी डॉ. कोदारे यांची पत्नी सौ. मीनल कोदारे व मुलगा डॉ. केतन यांनी मनोगतामध्ये सर्वोदय छात्रालयाचे विशेष आभार मानले.याप्रसंगी छात्रालयाचे माजी विद्यार्थी प्रा. प्रकाश मसुरकर यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, मी कॉलेज शिक्षणासाठी रत्नागिरीत आलो. पण नोकरीशिवाय शिक्षण होणे कठीणच होते. परंतु छात्रालय व हरिश्चंद्र गीते यांनी आधार दिला. फक्त आणि सर्वोदय छात्रालयामुळे हे शक्य झालं आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि सर्वोदयचे माजी विद्यार्थी अभय तेली यांनाही सन्मानित करण्यात आले. त्यांनीही मनोगतामध्ये छात्रालय व गीते सरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button