
गृहनिर्मितीत देशात महाराष्ट्र प्रथम तर राज्यात रत्नागिरी सहाव्या क्रमांकावर.
सर्वसामान्यांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी देशभरातील विविध राज्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. तरीही गृहनिर्माण प्रकल्पात आणि गृहनिर्मितीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. रत्नागिरी जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी आहे.देशात एकूण एक लाख ४४ हजार ७१७ नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात ३५ टक्के म्हणजे ५० हजार १६२ महारेराकडे नोंदणीकृत प्रकल्प आहेत. तर दुसर्या स्थानावर असलेल्या तामिळनाडूत २७ हजार ६०२ प्रकल्प आहेत. दरम्यान कोकणात २३,७७० प्रकल्प असून त्यातील १,०८७ प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
गृहनिर्माण क्षेत्रावर अंकुश ठेवण्याबरोबरच सामान्यांची घरे खरेदी करताना फसवणूक होवू नये, त्यासाठी केंद्राने सर्वच राज्यांना रेरा प्राधिकरणाची स्थापना करण्याचे निर्देश २०१६ च्या सुमारास दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या महारेरा प्राधिकरणाने नुकतेच नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानुसार महारेराकडे आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे ५० हजार गृहनिर्माण प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.www.konkantoday.com