
रत्नदुर्ग परिसरात पुन्हा एकदा नव्याने सापडले प्राचीन पटखेळ मंकलाचे अवशेष.
इतिहास संशोधक, कोकण दुर्ग अभ्यासक व मोडी लिपी जाणकार असलेल्या करजुवे (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी स्नेहल सुभाष बने यांचे संशोधन
रत्नागिरी : इतिहास संशोधक, कोकण दुर्ग अभ्यासक व मोडी लिपी जाणकार असलेल्या करजुवे (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी स्नेहल सुभाष बने यांनी रत्नागिरी शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला परिसरात नवीन प्राचीन बैठे खेळाचे अवशेष शोधले आहेत.मंकला हा खेळ जगभरात सर्वत्र खेळला जातो. विशेष करून आफ्रिकेत हा खेळ खूप प्रचलित आहे. दक्षिण आफ्रिकेत हा खेळ “बाव” या नावाने प्रसिद्ध आहे. या खेळाचे सुमारे ३५०० वर्षांपूर्वीचे संदर्भ आणि अवशेष इजिप्तमध्ये सापडलेले आहेत. पुरातन इजिप्तमध्ये ‘लुकजर कारनक’ या वास्तूमध्ये या खेळाचे अवशेष पाहायला मिळतात.


स्थालांतराने याचा प्रसार आफ्रिकापासून मध्य आशिया व दक्षिण आशिया खंडात झाला. बाराव्या शतकात या खेळाचे दोनशे प्रकार अस्तित्वात होते.आफ्रिकन समुदायातील लोक व्यापार व दळणवळणाच्या निमित्ताने समुद्र आणि पठारी मार्गाने ज्या ज्या ठिकाणावरून गेली. त्या-त्या ठिकाणी त्यांनी या खेळाचा प्रसार केला. भारत देशाने असेच काही खेळ आपलेसे केले आहे; पण वेगवेगळ्या राज्यात या खेळाची वेगवेगळी नावे आहेत. जसे की अलीगुली माने, चिने माने, हरलुमाने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही काही दक्षिणेतील नावे.


सातगोल, सातगोटी, गोगलगाय ही या खेळाची काही मराठी- हिंदी नावे. गुरुपल्याण हे या खेळाचे कोकणी नाव आहे.कोकण विभागात देखील या खेळाचे अनेक ठिकाणी अवशेष सापडले आहेत. रायगडावर देखील या खेळाचे अवशेष मिळाले आहेत. मंकला हा खेळ एका आयताकृती फळीवर समोरासमोर पाच, सहा, सात खड्डे कोरलेल्या अशा पटावर खेळला जातो. प्रत्येक पटाच्या रकाण्यात पाच कवड्या असतात. हा खेळ काही प्रतिष्ठित लोकांकडे धातूमध्ये नक्षीकाम करून बनवलेला असे. खेळामध्ये सोंगट्यांचा वापर म्हणून कवड्या, रंगीत दगड, कडधान्य बिया अगदी रत्न देखील वापरली जात. विविध लेणी समुदायात असे खेळ मोठ्या प्रमाणात कोरलेले मिळतात.महाराष्ट्रातील बऱ्याच लेण्यांमध्ये अशा अनेक प्रकारचे बैठे खेळांचे कोरीव प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये मंकलाचे अवशेष अधिक सापडतात. दक्षिण आफ्रिकेचा तर हा राष्ट्रीय बैठे खेळ आहे. वारी, मॅकोन, सोरो अशी काही विदेशी नावे देखील वेगवेगळ्या देशात प्रसिद्ध आहेत.

आजच्या तांत्रिक उपकरणांच्या माध्यमातून नवनवीन खेळ खेळले जातात त्यामुळे अश्या प्राचीन बैठे खेळांचे मूळ अस्तित्व हरवून बसले आहे. या पुरातन खेळांचे अस्तित्व ओळखून या खेळांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवतीचा किल्ला उभा आहे. या किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत पहिला महादरवाजा, दुसरा दीपगृह परिसर व तिसरा भगवती मंदिर. किल्ल्यात महादरवाज्याच्या दिशेने प्रवेश केला असता हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराशेजारीच गडाचा महादरवाजा आहे. हा दरवाजा आजही सुस्थितीत व भक्कम असला, तरी डागडुजी करण्याची व इथला परिसर संवर्धित करण्याची गरज आहेच; परंतु भरपूर जंगल असल्याकारणाने इथली वाट दुर्गम आहे. या मंदिरा शेजारीच या प्राचीन पटखेळाचे अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा २४ पटांचा मंकला हा उभ्या रांगेत १२ पट आणि आडव्या रांगेत बारापट असे एकूण २४ पट, तसेच दुसऱ्या ठिकाणी १२ पटांचे आणखी दोन मंकला असे एकूण तीन मंकला पटखेळ १ मे २०२५ महाराष्ट्र दिन रोजी रत्नदुर्ग महादरवाजा पेठ किल्ला येथे मिळाले; परंतु त्यात काही खेळ हे सिमेंटच्या वापरामुळे व ऐतिहासिक वास्तू जतन न करण्याच्या हलगर्जीपणामुळे खराब झालेत.रत्नदुर्ग हा अनेक पर्यटकांचा आकर्षणाचा दुर्ग आहे; परंतु या दुर्गाचे जतन व संवर्धन कार्य योग्य पद्धतीने केले गेल्यास या दुर्गाला पण पुरातत्वीय शासकीय मान्यता प्राप्त होऊ शकते, असे मत कोकण दुर्ग अभ्यासक व इतिहास संशोधक स्नेहल बने यांनी व्यक्त केले.

स्नेहल बने यांनी विरगळ व सतीशिळा, प्राचीन पट खेळ, मंदिर शैली यांच्यावर अभ्यास केलेला असून, काही पुरातन ऐतिहासिक वास्तू देखील त्यांनी यापूर्वी शोधलेल्या आहेत. हे खेळ शोधण्यास तेथील काही ग्रामस्थ तन्मय जाधव बालेकिल्लेदार यांची देखील मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.सहज चालता चालता नजर पडल्यास एका दगडावर शिल्पांसारखे दिसले. त्या जागी थोडी साफसफाई केली असता तेथे मंकला खेळाचे अवशेष दिसत असल्याचे आढळून आले. व त्या ठिकाणी आणखीनही खेळ असू शकतात या अनुषंगाने शोध घेतले असता अजुन दोन पटखेळ भेटले. अशा बैठे खेळांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न चालू असून त्यानुसार पुढे संवर्धन कार्यही सुरू होईल, असे स्नेहल बने म्हणाल्या.