
फर्निचर स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक दोघेजण राजस्थानमधून ताब्यात : रत्नागिरी पोलिसांची कामगिरी.
रत्नागिरी : एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे सोशल मीडियावर अकाउंट बनवत फर्निचर स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी राजस्थान येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिनेश कुमार मिना (रा. मांगीलाल, गाव भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगढ, राजस्थान) आणि राकेश कुमार मीना (भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगढ, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत.
दिनेश आणि राकेश यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केले. तसेच बनावट व्हॉटसॲपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधून फर्निचर स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत फिर्यादीची ३ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली. यासंदर्भात फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाव्द्वारे दिनेश कुमार मिना आणि राकेश कुमार मीना हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने रत्नागिरी पोलिसांचे एक तपास पथक राजस्थान येथे पाठविण्यात आले.
आरोपींचे कोणत्याही प्रकारचे मोबाईल लोकेशन प्राप्त नसताना स्थानिक बातमीदार तयार करून त्याआधारे या आरोपींना ताब्यात घेतले व त्यांना न्यायालयासमोर हजर करत त्यांची ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे.गुन्ह्याच्या तपासासाठी आणि आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी पोनि स्मिता सुतार, सपोनि नितीन पुरळकर, पोहवा रामचंद्र वडार, पोहवा विनोद कदम, पोशि अजिंक्य ढमढेरे यांनी ही कामगिरी बजावली आहे. “आर्मी, सीआरपीएफ आदी ठिकाणी अधिकारी आहेत असे भासवून बदली झाल्याचे कारण सांगून जुने फर्निचर/वाहने आदी कमी किंमतीत विकण्याचा बहाणा करून विकण्याचे आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.