
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर पुलाजवळ एका तरुणाला पूर्व वैमनस्यातून दारूची बाटली डोक्यात मारून जखमी केले.
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर पुलाजवळ एका तरुणाला एकाने पूर्व वैमानस्यातून दारूची बाटली डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना ०४ मे रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास घडली. अगदस मोहम्मद शफी कर्लेकर ( २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अगदस कर्लेकर हे त्यांच्या सुझुकी इको गाडी ( एम. एच.०८/झेड./८९६४) मधून आपल्या नातेवाईकांना साखरतर पुलाजवळ सोडण्यासाठी गेले होते.
नातेवाईकांना खाली उतरवून ते गाडीत बसत असताना, तिथे आरोपी समीऊल्ला अब्दल सलाम होडेकर (वय ४३) आला. त्याने ०३ मे रोजी साखरतर येथील रहेबर मोहल्ला स्मशानभूमीत हात धुताना फिर्यादी आणि त्याच्यात झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरला होता. याच रागातून आरोपीने त्याच्या हातात असलेली दारूची काचेची रिकामी बाटली अगदसच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मारली. या हल्ल्यात अगदस जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर आरोपीने त्याला ढकलून दिले, ज्यामुळे तो बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोवर आदळला आणि त्याच्या डाव्या हातालाही दुखापत झाली.आरोपी समीऊल्लाने अगदसला खाली जमिनीवर पाहून शिवीगाळ केली आणि त्याला ठार मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे