
गोकुळच्या गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयाची वाढ.
गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारपासून (ता. ५) नवे दर लागू होणार असून, त्यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या ग्राहकांना जादा दराने दूध खरेदी करावी लागणार आहे.आजपासून मुंबई व पुण्यात प्रतिलिटर म्हैस दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७४ रुपये; तर कोल्हापुरात हा दर ६६ रुपयांवरून ६८ रुपये होईल. मुंबई, पुण्यात गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ५६ वरून ५८ रुपये; तर कोल्हापुरात हा दर ४८ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे.
‘गोकुळ’च्या दुधाला कोल्हापूरसह मुंबई, पुण्यात मोठी मागणी आहे.एकट्या मुंबईत ‘गोकुळ’ची आठ लाख लिटर दुधाची विक्री होते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘गोकुळ’ने जानेवारी महिन्यात दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. मात्र, विक्री दरात वाढ केली नव्हती. मध्यंतरी गायीच्या दूध खरेदी दरातही वाढ करण्यात आली होती. राज्यात अमुलसह मदर डेअरीने दूध विक्री दरात एक मेपासून प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे ‘गोकुळ’नेही दूध विक्री दरात वाढ केली आहे.




