शक्‍तिपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध- माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर.

शक्‍तिपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्‍तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल.हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.आमदार केसरकर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शक्‍तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६० टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत.

आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही ही जंगले राखली म्हणून आमचा विकास थांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? शक्‍तिपीठ महामार्गाला विरोध करणे हा कोणता न्याय आहे?’ते पुढे म्हणाले, ‘नागपूरमध्ये वाघ दिसतात, तर आमच्या जंगलात काळा बिबट्या पाहायला मिळतो. येथे समुद्रही आहे. त्यामुळे शक्‍तिपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नागपूरहून सुरू होणारा महामार्ग वाढवण बंदराला जोडला जातो, तसाच शक्‍तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा. रेडी बंदरातून आयात-निर्यात सुरू झाल्यास नागपूरची संत्री परदेशात जाईल आणि सिंधुदुर्गचा आंबा दिल्ली-नागपूरला पोहोचेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button