
पहलगामच्या हल्ल्यानंतरच हिंदुस्थानात राहणाऱ्या या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल.
पहलगामचा हल्ला झाल्यावर देशातील पाकिस्तानी नागरिकांची पाकिस्तानात रवानगी करण्याची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक, राजस्थानात 30 हजार, छत्तीसगडमध्ये 2 हजार, मध्य प्रदेशात 228 व खुद्द देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 5 हजार पाकिस्तानी बिनबोभाटपणे राहत असतील तर देशाच्या सुरक्षेशी तो मोठाच खेळ आहे.मुळात पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी? हे एवढे आले कोठून? पुन्हा पहलगामच्या हल्ल्यानंतरच हिंदुस्थानात राहणाऱ्या या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली? सरकारकडे याचे उत्तर आहे काय? असे प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहेत.
सीमेवर सुरक्षा दलांचा खडा पहारा असताना या घुसखोरांनी बिळे कशी केली? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला जनतेचा चौकीदार म्हणवून घेतात; पण सीमेला भगदाडे पाडून पाकिस्तानी नागरिक, घुसखोर, अतिरेकी सीमा ओलांडून हिंदुस्थानात येत असतील, देशाच्या कुठल्याही राज्यात जाऊन आरामात राहत असतील आणि पहलगामसारखे हल्ले तसेच हत्याकांड घडवून गायब होत असतील तर, सरकार नावाची यंत्रणा, देशाचे गृहखाते आणि गुप्तचर यंत्रणा नेमके काय करीत आहेत? असा रोखठोक सवालही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.सामना दैनिकातील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे