
बंदर खात्याच्या जागेवर कोणी अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्यास मी स्वतः येऊन या सगळ्या गाड्या समुद्रात लोटून टाकीन- मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर.
मंत्री नितेश राणे यांनी आपला दापोली दौरा विविध वक्तव्याने गाजवला दापोली दौऱ्यावर असणाऱ्या ना. राणे यांनी अडखळ बंदराला भेट देऊन जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अडखळ बंदर जेटीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची त्यांनी कान उघडणी केली. मला खोटी माहिती देऊ नका, खोटी माहिती द्याल तर डबल फाईन करेन अशा शब्दात त्यांनी ठेकेदाराला सज्जड दम भरला. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जेटीवर गाड्या पार्किंग केल्याने दोन गटात मोठा राडा झाला होता. या ठिकाणी गाड्यांना पार्किंग करीता परमिशन कोण देतो? ही बंदर विकास खात्याची अंतर्गत जागा आहे यावरून त्यांनी बंदरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.
तुम्ही याकडे लक्ष दिले नाहीत तर तुम्हाला घरात पाठवावे लागेल अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी बंदर विकास खात्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश दिले. बंदर खात्याच्या जागेवर कोणी अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्या तर त्या समुद्रात लोटायला मी स्वतः इथे येईन, शासनाच्या जागेचा वापर शासकीयच झाला पाहिजे, त्यात अधिकाऱ्यांकडून कसूर झाल्यास त्यांच्यावर थेट कारवाईच केली जाईल अशा शब्दात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अडखळ जेटीवर दोन गटांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना खडे बोल सुनावले.




